Mumbai Padvidhar Election : शिवसेनेने नोंदवलेली शेकडो नावं बाद, सगळं ठरवून केलं; अनिल परब यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मुंबई पदवीधर निवडणुकीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहबे ठाकरे ) नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नोंदवण्यात आलेली नावे रदद् करण्यात आली आहेत. शिवसेनेकडून भरण्यात आलेले अर्ज जाणीवपूर्वक बाद करण्यात आले आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

अर्ज भरल्यानंतर अर्ज तपासला जातो आणि तपासल्यानंतर आम्हाला त्याची पोचपावती दिली जाते. याचा अर्थ असा की मी अर्ज भरला आहे आणि माझा अर्ज ओके झाला तरच ती पावती मिळते. ज्यावेळी काही कारणासाठी ते अर्ज नाकारले जातात, त्यावेळेला ते तिथेच परत दिले जातात. शिवाय अर्ज नाकरण्याची कारणे तिथेच सांगितली जातात. परंतु आताचा जो चाळीस हजाराचा सप्लिमेंटरी रोल आला त्याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावे ही ठरवून बाद केलेली आहेत, असे चित्र आम्हाला दिसत असल्याचा आरोप अनिल परब यांनी यावेळी केली. तुमच्यासमोर ज्या स्लीप दिसत आहेत. त्या प्रातिनिधीक स्वरुपात तुमच्यासमोर ठेवल्या आहेत. परंतु आमच्याकडे ऑफिसमध्ये बऱ्याच प्रमाणात अशा स्लीप आल्या आहेत. स्लीप आहेत ज्याच्यामध्ये या रिसिप्ट आहेत. ज्याच्यामध्ये आमचा अर्ज तुमच्याकडे गेलेल्याची पोचपावती आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.

आमच्या लोकांनी ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्या ऑनलाईन नोंदणीमध्ये देखिल तुम्ही जर चुकीचा अर्ज भरलेला असेल, त्याला पात्र नसाल तर तो अर्ज मंजूर होत नाही. माझ्या स्वत:च्या मुलीचे नाव देखील बाद झालेले आहे. अशी माझ्या घरातील अनेकांनी नोंदणी केली आहे ते रिजेक्ट झालेले आहेत. माहिती अपलोड झाली आहे आणि पोचपावती आलेली आहे आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेली नावे बाद झालेली आहेत आणि भाजपने नोंदवलेली नाव ही सगळीच्या सगळी मंजूर झालेली आहेत, असे अनिल परब म्हणाले. आज आपल्या समोर हा घोळ आणण्याआधी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो. निवडणूक अधिकारी आम्हाला टाळत आहेत. पण सुदैवाने तिथे कुलकर्णी नावाचे अधिकारी होते, जे निवडणूक आयोगाचे जॉईंट सीईओ आहेत आणि कलेक्टर साहेबही त्यावेळी होते. आम्ही त्यांच्यासमोर या सर्व बाजू मांडल्या. माझा अर्ज नाकारता त्यावेळी माझा अर्ज का नाकारत आहेत? याचे कारण कळले पाहिजे, अशी मागणी केल्याचे अनिल परब म्हणाले.

आता निवडणुकीसाठी केवळ पाच सहा दिवस उरले आहेत. याचे कारण तुम्ही देणार कधी, तपासणार कधी आणि आम्हाला सांगणार कधी आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या आम्हाला अॅक्नॉलेजमेंट तपासून या सगळ्यांना मतदान करायला मिळायला पाहिजे. कारण त्यांचे अर्ज तुम्ही मंजूर केलेल आहेत. अशी मागणी त्यांच्यासमोर केल्याचे ते म्हणाले. हे सगळं ठरवून केलेले आहे एवढे नक्की. कारण जी नावे त्यांना माहित आहेत, शिवसेनेच्यावतीने आली आहेत. आमचे कार्यकर्ते पाच-पाच दहा-दहा अर्ज पाठवत होते. तशी त्यांनी परवानगी दिली होती. ही सगळी नावं त्यांनी बाद केलेली आहेत, असे अनिल परब यांनी सांगितले.

त्याबरोबर एका घरामध्ये नवरा-बायको याला एकाला मतदान पूर्वेला एकाला मतदान पश्चिमेला. ज्यांचा पत्ता एकच आहे. नवरा-बायको आहेत. हे रेकॉर्ड वरती आहे तरी देखिल अशा प्रकारचा मोठा घोळ आहे. अशी कित्येक नावे दिली. वांद्र्याच्या व्यक्तीचे नाव मुलुंडला आले आहे. काही लोकांची नावे विक्रोळीमध्ये आलेली आहेत. काही लोकांची नावे वेगवेगळ्या सेंटरला गेली आहेत, अशी देखिल नावं ही टाकली आहेत. ही नावं आता ठरवून टाकली आहेत की प्रक्रियात्मक त्रुटी आहेत याची चौकशी व्हायला हवी, दोषींवर कारवाई व्हायला हवी. परंतु निवडणूक यंत्रणेत काम करणारे उत्तर पश्चिममध्ये काय झाले, कोणावरही कारवाई नाही. आमची एकच निवडणूक आयोगाकडे मागणी आहे प्रोसिजरल लॅप्स करू नका. तुम्ही ज्यांच्या चुका झाल्या आहेत, ज्यांनी ही नावे गाळलेली आहेत आम्हाला कळलं पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.