शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अॅड. अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांनी आज कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत आपले उमेदवारी अर्ज सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनात दाखल केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी हे अर्ज स्वीकारले. या वेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अनिल परब आणि ज.मो. अभ्यंकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे सादर केले. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-सचिव अनिल देसाई, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, विधानसभेतील शिवसेना गटनेते अजय चौधरी, आमदार संजय पोतनीस, विलास पोतनीस, ऋतुजा लटके, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, सपाचे आमदार रईस शेख, शेकापचे नेते-आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी महापौर-उपनेते दत्ता दळवी, उपनेते अमोल कीर्तिकर, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडून येणारच!
मुंबई पदवीधर मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने राखला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे मला उमेदवारी मिळाली आहे. हा मतदारसंघ शिवसेना पुन्हा आपल्याकडेच राखेल. शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्या ताकदीवर मी निवडून येईनच. उद्या शिवसेना आणि महाविकास आघाडी जिंकणार आहे. या विजयाचा आनंद मुंबई पदवीधरच्या निवडणुकीत द्विगुणित होईल, असा विश्वास या वेळी आमदार अॅड. अनिल परब यांनी व्यक्त केला.
मराठी, इंग्रजीला दिलेल्या दुय्यम वागणुकीला विरोध करणार
पेंद्र सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण ठरवले आहे, त्या धोरणाला शिवसेनेने विरोध केलेला नाही. मात्र राज्य सरकारने जो अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला आहे, त्याला शिवसेनेचा जोरदार आक्षेप आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधील विद्यार्थ्यांचे काwशल्य वाढणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारने या दोन्ही भाषांना दुय्यम स्वरूप दिले आहे. सरकारच्या या भूमिकेला शिवसेना विरोध करणार आहे. मुंबईतील शिक्षकांचे प्रश्न शिवसेनेने मोठय़ा प्रमाणात सोडवले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्याच मागे शिक्षक मोठय़ा संख्येने आहेत, अशी प्रतिक्रिया या वेळी ज.मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केली.