
फेब्रुवारीच्या मध्यावरच मुंबईकरांना वैशाख वणव्याचे चटके सहन करावे लागत आहेत. मागील आठवडाभरापासून सरासरीपेक्षा अधिक पातळीवर राहिलेल्या पाऱयाने शनिवारी यंदाच्या हंगामातील विक्रमी पातळी गाठली. सांताक्रुझमध्ये कमाल तापमान थेट 38 अंशांवर पोहोचले, तर कुलाब्यात 6 अंशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांची प्रचंड काहिली झाली.
उत्तरेकडील वाऱयाचा वेग मंदावून पूर्वेकडून आलेले कोरडे वारे अधिक सक्रिय झाल्यामुळे मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 22 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत तापमान चढेच राहणार आहे. शनिवारी सांताक्रुझमध्ये कमाल तापमान 7 अंशांनी अधिक होते, मात्र पहाटेच्या सुमारास तापमान 20 अंशांच्या खाली राहत असल्यामुळे मुंबईकरांना उकाडय़ापासून तेवढाच दिलासा मिळत आहे. शुक्रवारपाठोपाठ शनिवारी 19 अंश इतके किमान तापमान नोंद झाले. पुढील आठवडय़ात किमान तापमान सरासरीपेक्षा कमीच नोंद होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र दिवसाच्या उकाडय़ापासून तूर्त दिलासा मिळण्याची शक्यता नाही.






























































