पालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा

जोरदार पावसामुळे मुंबईच्या विविध भागात साचलेले पाणी उपसण्यासाठी पालिकेने शेकडो पंप बसवले आहेत. पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणी उचलून समुद्रात टाकले जात आहे. यामध्ये मंगळवारपासून आतापर्यंत तुळशी तलावाइतके म्हणजेच सुमारे 8 हजार दशलक्ष लीटर पाणी उपसून समुद्रात फेकले असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

मुंबईत काल पासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पाश्र्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी धारावी आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भेट दिली. यानंतर त्यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमीगत टाक्या बांधणार असल्याचे सांगितले. मुंबईतील स्थितीबाबत मुख्यमंत्री, महापौर, प्रशासन यांच्याशी संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. जुलै महिन्यात आलेल्या वादळादरम्यान मुंबईत 103 किमी वेगाने वारे वाहत होते. यावेळी इमारतीवरील छप्पर उडाले होते. मुंबईत या आधी अशी स्थिती मी कधी पाहिली नाही. हे वातावरणातील बदल व जागतिक पर्यावरण बदल पाहता यावर काम करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर पालिका मुंबईत आवश्यक उपाययोजना करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

असे होतेय काम…

मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये मोठा पाऊस पडला त्यानंतर पालिकेने ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प हाती घेतले. त्यानुसार मुंबईत पम्पिंग स्टेशन बांधण्यात आली. अद्यापही दोन पम्पिंग स्टेशनचे काम बाकी आहे. त्याच्या परवानग्या मिळवून काम लवकरच पूर्ण केले जाईल. मुंबईत पावसाच्या पाणी वाहून नेणाऱ्या 25 आणि 50 मिलिमीटरच्या वाहिन्या आहेत. त्या सर्व ठिकाणी बदलता येत नसल्या तरी पम्पिंग स्टेशनद्वारे शहरात साचलेले पावसाचे पाणी समुद्रात टाकले जात असल्याचे ठाकरे म्हणाले. बदलत्या वातावरणानुसार निसर्गात होणारे बदल, अतिवृष्टी, दुष्काळ यावर उपाययोजना करण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे, पालिका आयुक्तांनी घेतला मुंबईच्या स्थितीचा आढावा

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देऊन मुंबईच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच मुंबईच्या विविध भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीदेखील मुंबईच्या विविध भागात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या