
केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवू शकत नाही असे निरीक्षण नोंदवत फौजदारी गुन्ह्यांतील दोषत्वासंबंधी उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हत्येच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या दोघांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने 2018 मध्ये दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाचा हा आदेश न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने रद्द करीत आरोपींना दिलासा दिला.
मुकेश मुसहर आणि अविनाश पिंपळकर या दोघांनी उच्च न्यायालयात मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्यांच्या अपिलावर न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. या प्रकरणात पुरावे अपूर्ण असल्याचा ठपका ठेवत खंडपीठाने हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन तरुणांची निर्दोष मुक्तता केली. केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने यावेळी दिला आहे.
2016 मध्ये पी. डीमेलो रोडवर 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी अविनाश पिंपळकर आणि मुकेश मुसहर या दोघांना अटक केली होती. सत्र न्यायालयाने 2018 मध्ये या दोघांना दोषी ठरवून जन्मठेप सुनावली होती.





























































