लॉकडाऊन कालावधीतील वाढीव बिलाच्या तक्रारी तात्काळ सोडवा, हायकोर्टाचे महावितरणला आदेश

478

लॉकडाऊनच्या काळात आपल्या ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवून शॉक देणाNया महावितरण कंपनी विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. ग्राहकांच्या तक्रारी वाढत असून या तक्रारींचे तात्काळ निवारण करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज महावितरणला दिले.

मार्च ते मे या कालावधीत अनेक ग्राहकांना वीज कंपन्यांनी फुगलेली वीज बिले पाठवल्याच्या तक्रारी उघडकीस आल्या आहेत. मुलुंड मधील व्यावसायिक रवींद्र देसाई यांना कंपनीने सरासरी बिलाच्या १० पट जास्त बिल पाठवले आहे. या प्रकरणी अ‍ॅड. विशाल सक्सेना यांच्या वतीने देसाई यांनी हायकोर्टात एमएसईडीसीएल, अदानी आणि टाटा पावर यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. तर सांगली येथील एम. डी. शेख यांनाही भरमसाट बिल पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी शेख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती पी. बी. वरळे आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी महावितरणच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड. दीपा चव्हाण यांनी कोर्टाला सांगितले की, महावितरण तक्रारींची दखल घेत आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये बिलांची रक्कम चुकीची नाही. ग्राहकांना डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या सरासरी वापरानुसार बिल पाठवण्यात आले.

तक्रार निवारण समिती

महावितरण कंपनीने ग्राहकांच्या बिलासंदर्भातील सर्व तक्रारींची दखल घेण्यासाठी आधीच त्रिस्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे असे अ‍ॅड. चव्हाण यांनी कोर्टाला सांगितले हायकोर्टाने याची दखल घेत या तक्रार निवारण समितीकडे दाद मागण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले तसेच ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्यास महावितरणला बजावत ऑनलाईन तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यास खंडपीठाने महावितरणला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या