धक्का मारल्याने पदर सरकणे ‘‘विनयभंग’ नव्हे, उच्च न्यायालयाने एका आरोपीचा गुन्हा केला रद्द

धक्का मारल्याने महिलेचा पदर सरकल्यास यामागे विनयभंगाचा हेतू होता हे स्पष्ट होत नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने एका आरोपीचा गुन्हा रद्द केला.

घाटकोपर येथील कमलेश मिश्रा व प्रदीप मिश्राने हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती. न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

महिलेच्या तक्रारीनुसार ही घटना घडली तेव्हा याचिकाकर्ते तिच्याकडे रागाने बघत होते. त्यांनी तिला लिफ्टमध्ये ढकलले. त्यावेळी महिलेचा पदर सरकला. ही कृती रागात घडली आहे. यामागचा विनयभंगाचा हेतू स्पष्ट होत नसल्याने आयपीसी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

साडीचा पदर ओढल्याने लज्जा निर्माण झाली. माझ्या पतीवर कमलेशचा राग होता. त्यामुळेच त्याने हे कृत्य केले. हा गुन्हा रद्द करू नये, अशी विनंती महिलेने केली होती. कमलेश विरोधात पुरावे आहेत, असा दावा सरकारी वकील मानपुंवर देशमुख यांनी केला होता. मात्र ही कृती विनयभंगाच्या हेतूने नव्हती, असे सांगत न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला.

पदर ओढून ढकलल्याचा आरोप

कमलेश मिश्राने हात पकडला व प्रदीपने तोंड दाबले. नंतर कमलेशने पदर ओढला व लिफ्टमध्ये ढकलले. यात पदर सरकला. हा विनयभंगाचा प्रकार असल्याचा आरोप करत महिलेने पोलिसांत याचा गुन्हा नोंदवला. सकाळी ही घटना घडली. संध्याकाळी कमलेश घरी आला. सकाळी घडलेल्या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तुझा खून करण्याची सुपारी देईन, असेही त्याने धमकावले, असा दावाही पीडित महिलेने केला होता. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांविरोधातील धमकावल्याचा गुन्हादेखील रद्द केला.