पूर्वीच्या काळी प्रसारमाध्यमे तटस्थ राहायची, पण आता ती विभागली आहेत, हायकोर्टाकडून टीव्ही चॅनल्सची कानउघडणी

पूर्वीच्या काळात एखादी घटना घडल्यास प्रसारमाध्यम त्या घटनेकडे तटस्थपणे बघायची पण आता काळ बदलला आहे माध्यमांचे प्रचंड ध्रुवीकरण झाले असून प्रसारमाध्यम विविध गटात विभागली गेली आहेत अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मिडिया ट्रायल घेणाऱया टीव्ही चॅनेल्सना आज सुनावले

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मीडिया ट्रायलद्वारे विविध वृत्त प्रसारित केली जात आहेत. त्यामुळे मिडिया ट्रायलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते निलेश नवलखा यांनी याचिका दाखल केली आहे तर याप्रकरणात पोलिसांची बदनामी होत असल्याने निवृत्त आयपीएस पोलिस अधिकाऱयांनी व आणखी एका संस्थेने हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

खंडपीठाने माध्यमांना खडे बोल सुनावले.

‘प्रश्न नियमावलीचा नाही तर यातून काय शिल्लक राहते याचा आहे. लोक आपली मर्यादा विसरतात पण प्रत्येकाने मर्यादेत राहूनच जे काही करायचे आहे ते केल पाहिजे. तुम्हाला सरकारवर टीका करायची आहे, जरूर करा पण हे प्रकरण कोणाच्या तरी मृत्यूशी निगडित आहे याचेही भान असू देत. या प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप करताय असे तुमच्यावर आरोप आहेत अशा शब्दांत खंडपीठाने टीव्ही चॅनेल्सचा समाचार घेतला.

सुशांत प्रकरणाबाबत कोणतीही माहिती लिक केलेली नाही

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत कोणतीही गोपनीय माहिती सीबीआय, एनसीबी तसेच ईडीने लिक केलेली नाही अशी माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला दिली. तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रच हायकोर्टात आज सादर करण्यात आले. आम्हाला आमच्या जबाबदाऱयांची जाणीव आहे त्यामुळे तपास यंत्रणेद्वारे माहिती लिक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तिवाद एएसजी अनिल सिंह यांनी केला. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी पुढील आठवडय़ापर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या