
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस प्रचंड धावपळीचा ठरला. ऐन पीक अवर्सला लोकल सेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी झाली. बोरीवली, अंधेरी आणि वांद्रे स्थानकामध्ये सकाळच्या सुमाराला प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. चर्चगेटला जाणाऱया लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशिराने धावल्या.
चर्चगेटच्या दिशेने जाणाऱया धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन विलंबाने धावत होत्या. काही गाडय़ा अचानक दुसऱया ट्रकवर वळवण्यात आल्या. नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून अनेक कुटुंबीय देवदर्शनासाठी चालले होते. लोकल ट्रेनच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे नियमित प्रवाशांबरोबर कुटुंबीयांसोबत देवदर्शन आणि ‘मुंबई दर्शन’ करायला निघालेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
मध्य आणि हार्बरची नेहमीचीच रखडपट्टी
मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर विस्कळीत वेळापत्रकाचा गोंधळ गुरुवारीही कायम राहिला. मेन लाईनच्या लोकल ट्रेन जवळपास 20 ते 30 मिनिटे उशिराने धावल्या, तर हार्बर मार्गावरील अनेक गाडय़ांना तब्बल 40 मिनिटांचा विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळप्रमाणे संध्याकाळी लोकल सेवेचे वेळापत्रक विस्कळीत राहिल्याने प्रवाशांचा अख्खा दिवस वाया गेला.































































