महाराष्ट्रात अपघातांची मालिका संपायचं नावचं घेत नाही. पुन्हा एकदा मुंबईत हीट अॅड रनची घटना घडली असून यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका आलिशान कारने महिलेला चिरडल्याने संपूर्ण मालाड परिसर हादरला आहे. या अपघातानंतर आरोपीला प्रत्यक्षदर्शींनी आणि नागरिकांनी बेदम मारहाण केली आहे. दरम्यान मालाड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील मालाड परिसरात मंगळवारी रात्री एका भरधाव कारने 27 वर्षीय महिलेला चिरडलं. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही महिला मेहंदी क्लास संपवून घरी परतत होती. यावेळी एका आलिशान कारने या महिलेला चिरडलं. आपण एका महिलेला धडक दिल्याचे लक्षात येऊनही त्या नराधमाने कार थांबवली नाही. त्याने महिलेला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं.
अपघात झाल्यानंतर नागरिकांनी कारचालकाला घेरलं आणि बेदम मारहाण केली. यात आरोपी कारचालक जखमी झाला. संतप्त जमावानं कारचीही तोडफोड केली आहे. या दरम्यान इतर नागरिकांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अपघातातील आरोपी कारचालक हामर्चंट नेव्हीमध्ये सेवेला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या मालाड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. तसेच आरोपीने मद्यपान केलं होतं किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.