‘मुंबई मेट्रो’चे हायटेक पाऊल, धावत्या ट्रेनच्या पॅन्टोग्राफची स्वयंचलित तपासणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामुंबई मेट्रोमध्ये देशातील पहिली स्वयंचलित ‘पॅन्टोग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली’ कार्यान्वित करण्यात आली आहे. नव्या ‘एआय’आधारित प्रणालीमुळे प्रत्येक धावत्या ट्रेनच्या पॅन्टोग्राफची रिअल-टाइममध्ये ऑपरेशनल वेगातच स्वयंचलित तपासणी होणार आहे. त्यामुळे कार्बन स्ट्रिपची असमान झीज, तडे, संरचनात्मक त्रुटी यांसारखे किरकोळ दोष वेळेत निदर्शनास येणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महामुंबई मेट्रोमध्ये ही अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित केली आहे. ‘एआय’आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंगमुळे पॅन्टोग्राफ तपासणीचा कालावधी 30 मिनिटांवरून काही सेपंदांपर्यंत कमी होणार आहे. तसेच देखभाल कार्यक्षमतेत 90 ते 95 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लार्ंनग, हायस्पीड लेझर स्पॅनिंग आणि प्रगत थ्रीडी इमेजिंग तंत्रज्ञानाचा थेट मेट्रो संचालनात वापर करण्यात आला आहे. नव्या प्रणालीमुळे कार्बन स्ट्रिपमधील तडे, चिप्स, असामान्य झीज, कार्बनचे तुटलेले भाग यांचे निरीक्षण करण्यासह उर्वरित कार्बन जाडीचे अचूक मोजमाप आणि कालांतराने होणाऱया झिजेचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे देखभाल पथकांना भाग बदलण्याची योग्य वेळ अधिक अचूकपणे निश्चित करता येणार असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे. कार्बन स्ट्रिपची असमान झीज, तडे, संरचनात्मक त्रुटी यांसारखे किरकोळ दोष वेळेत निदर्शनास येणार असल्यामुळे नवी प्रणाली एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.