मुंबईतील उद्योजकाचे 55 लाख लंपास

447

मुंबईतील उद्योजक व तालुक्यातील जामगावचे रहिवासी सुरेश धुरपते यांच्या आलिशान वाहनातून तब्बल 55 लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.

धुरपते मंगळवारी रात्री मुंबईहून जामगाव येथे आपल्या मोटारीने आले. घरी पोहचल्यानंतर त्यांनी चालकाला मोटारीतील कपडय़ांची बॅग घरात ठेवण्यास सांगितले. दुसऱया एका बॅगमध्ये 55 लाखांची रोकड होती. ती बॅग मात्र मोटारीतच ठेवण्यास धुरपते यांनी चालकास सांगितले. त्यानंतर चालक आपल्या घरी निघून गेला. रात्री उशिरा धुरपते हे घराबाहेर आले असता त्यांच्या मोटारीच्या मागील बाजूची काच फुटलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मोटार उघडून पाहिले असता 55 लाखांची रोकड असलेली बॅग तेथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. धुरपते यांनी तत्काळ गावातील सहकारी, तसेच चालकाला घरी बोलावून घेतले. गावात ठिकठिकाणी तपास करूनही काहीही सुगावा लागला नाही.

बुधवारी मध्यरात्री धुरपते सहकाऱयांसह पारनेर पोलीस ठाण्यात पोहचले. रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. चर्चेनंतर धुरपते यांनी पोलीस प्रशासनास तपशील सादर केला व त्यानंतर उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू झाले.

आपली प्रतिक्रिया द्या