45 लाख मुंबईकरांना पुराचा धोका

पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी अजूनही पाणी तुंबणारी 100 ठिकाणे असल्याचे समोर आले असताना एक कोटी 30 लाखांच्या लोकसंख्येपैकी तब्बल 35 टक्के म्हणजे सुमारे 45 लाख मुंबईकर पूरप्रवण क्षेत्राजवळ राहत असल्याचे पालिकेच्याच अहवालातून समोर आले आहे. हे रहिवासी पूरप्रवण म्हणून नोंदवलेल्या ठिकाणांच्या 250 मीटर परिसरात राहत आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पूरप्रवण क्षेत्रे कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे.

सात बेटांवर वसलेले मुंबई शहर बशीच्या आकाराचे असून अनेक भाग परिणामकारक उपाय समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहेत. त्यामुळे मुंबईत अतिवृष्टी होत असताना समुद्राला भरती आल्यास पावासाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. तर अतिवृष्टीतही नदी नाल्यांमधील गाळामुळे पावसाचे नागरी वस्तीत घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे काही वेळा अतिवृष्टीत या पूरप्रवण भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. त्यामुळे पूरप्रवण क्षेत्रे कमी करण्यासाठी पालिका अनेक उपाययोजना करत आहे.

– नाल्यांलगतच्या झोपडय़ांमधील हानी टाळण्यासाठी संरक्षक भिंतींची उभारणी.
– मिलन सब वे, प्रमोद महाजन गार्डन, हिंदमाता येथे भूमिगत पाणी साठवण टाक्या.
– आयआयटी तंत्रज्ञानाने पावसाच्या पाण्याच्या निचऱयासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया.
– दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभाट नद्यांवर एमबीआर तंत्रज्ञानावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प.

अशा होताहेत उपाययोजना

मुंबईत सुमारे 2300 मिमी पाऊस पडतो. यामध्ये अनेक वेळा कमी वेळात 200 ते 400 मिमी पाऊस पडल्याचे प्रकार घडत असल्याने पुराचा धोका संभवतो. अशा वेळी पर्जन्य जलवाहिन्यांचे काम महत्त्वपूर्ण ठरते. यामध्ये पुराचा सामना करण्यासाठी पर्जन्य जल खात्याकडून पर्जन्य जलवाहिन्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये नाल्यांची पाणी बाहन नेण्याची क्षमता वाढवण्यात येईल

सेंट पॉल रोड, वाकोला नदी, मोतीलाल नगर रोड, एम. सी. रोड, मरोळ भंडार, वांद्रे रेल्वे वसाहत यासारख्या पूरप्रवण क्षेत्रातील पूर कमी करण्यासाठी बॉक्स ड्रेनचा वापर वाढवण्यात येत आहे. यामुळे विद्यमान वाहिन्या, मोऱ्या आणि नाल्यांवरील भार कमी होऊन अतिवृष्टीत पूरसदृश स्थिती टाळता घेईल