शिवसेना-मनसे युतीचे शिलेदार मैदानात; मुंबईत 227 जागांसाठी तीन हजार उमेदवार रिंगणात, 3 जानेवारीला लढतींचे चित्र स्पष्ट होणार

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे युतीच्या शिलेदारांनी आज वाजतगाजत, गुलाल उधळत उमेदवारी अर्ज दाखल केले. ‘शिवसेना-मनसे युतीचा विजय असो’, अशा गगनभेदी घोषणा देत यावेळी कार्यकर्त्यांनी पालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निर्धारच व्यक्त केला. मुंबईत 227 जागांसाठी तीन हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर 3 जानेवारी रोजी अंतिम यादी आणि चिन्हवाटप केले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना-मनसेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा निवडणुकीच्या निमित्ताने झाल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. त्यामुळे शिवसेना-मनसेच्या उमेदवारांनी आज मोठय़ा उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले. आता 15 जानेवारी रोजी होणारे मतदान आणि 16 जानेवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युतीच्या भक्कम एकजुटीचे दर्शन

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ असल्याने सकाळपासून निवडणूक कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली. शिवसेना-मनसे युती झाल्यामुळे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे, भगव्या टोप्या घालून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढल्या. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात दोन्ही पक्षांचे झेंडे, उपरणी असल्याने शिवसेना-मनसेच्या भक्कम एकजुटीचे दर्शनही दिसले.