पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी 29 हजार बोनस

मुंबई महानगरपालिकेच्या कामगार-अधिकाऱ्यांना या वर्षी 29 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बोनसमध्ये एक हजारांची वाढ करण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना या वर्षी 30 हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी कामगार संघटनांच्या समन्वय समितीकडून करण्यात आली होती. पालिकेच्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी वाढीव बोनस द्यावा, अशी मागणी कामगार संघटना समन्वय समितीकडून करण्यात येत होती. यासाठी पालिका आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडेही समन्वय समितीची बैठक पार पडली. मात्र आज पालिका आयुक्तांसोबत समन्वय समितीच्या बैठकीत आयुक्तांनी 29 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, अशोक जाधव, वामन कविस्कर, दिवाकर दळवी, रमेश भुतेकर – देशमुख, अ‍ॅड. मृदुला पाटील, अ‍ॅड. प्रकाश देवदास, के. पी. नाईक, संजीवन पवार, यशवंत धुरी, साईनाथ राजाध्यक्ष, शरद सिंग, प्रमोद नारकर, जगन्नाथ लिंगम, अरुण नाईक आदी उपस्थित होते.

असा मिळणार बोनस

महानगरपालिका अधिकारी-कर्मचारीः 29 हजार रुपये
अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः 29 हजार रुपये
महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः – 29 हजार रुपये
माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित) – 29 हजार रुपये
माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित) – 29 हजार रुपये
अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित)- 29 हजार रुपये
अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) – 29 हजार रुपये
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका – भाऊबीज भेट 12 हजार रुपये
बालवाडी शिक्षिका/मदतनीस – भाऊबीज भेट – 5 हजार रुपये

‘बेस्ट’ कर्मचारी वेटिंगवर

गेल्या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांनाही 26 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. तर यावर्षी 30 हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी बेस्ट महाव्यवस्थापकांकडे केल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. तर पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.