
शिवसेनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कॉटनग्रीनमध्ये मुंबई महापालिकेकडून कॉटनग्रीन स्थानकाजवळ स्कायवॉक बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा स्कायवॉक थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एकला जोडला जाणार असून पुढील तीन ते चार महिन्यांत हा स्कायवॉक रहदारीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे काळाचौकी, घोडपदेवमधील हजारो रहिवासी, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कॉटनग्रीन स्थानकाजवळ स्कायवॉक उभारून तो थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एकला जोडावा. त्यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या काळाचौकी, घोडपदेव येथील स्थानिकांना चढउतार करावा लागणार नाही, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी शिवसेनेकडे केली होती. रेल्वेकडे या स्कायवॉकसाठी निधी उपलब्ध नसल्याने या पुलाचे काम मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प निधीतून करण्यात यावे यासाठी गेली दोन वर्षे शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पाठपुरावा केला होता.
अरविंद सावंत यांच्या प्रयत्नांमुळे मिळाली एनओसी
हा स्कायवॉक थेट प्लॅटफॉर्म नंबर एकला जोडण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट तसेच रेल्वे खात्याचे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र गरजेचे होते. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून या स्कायवॉक कामाला आता सुरुवात झाली आहे. अंदाजे पुढील 3 ते 4 महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर हा स्कायवॉक रहिवाशी, प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या कामाच्या मंजुरीसाठी आमदार अजय चौधरी यांचेदेखील सहकार्य मिळाले, अशी माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.