मुंबई नाशिक महामार्ग पुढील अडीच वर्षात सुरू होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

मुंबई नाशिक महामार्गासाठी 5 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच हा महामार्ग पुढील अडीच वर्षात सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आज नाशिक येथे 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या 12 प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. मुंबई-नाशिक महामार्गासाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून येणाऱ्या दोन ते अडीच वर्षात नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ अडीच तासात होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रकल्पांमध्ये 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे.सद्यस्थितीत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आलेली आहेत. नव्या महामार्गांच्या प्रकल्पामुळे नाशिकची कनेक्टीव्हिटी संपूर्ण देशात वाढणार आहे. सूरत-नाशिक-नगर-सोलापूर ते चेन्नई पर्यंतच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला भारतमाला परियोजना फेज-1अंतर्गत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच नाशिक ते मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीसह त्याच्या नूतनीकरणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या मंजुरीसह पिंपरीसदो ते गोंदे या 20 किमी मार्गाचे सहा पदरीकरण व नाशिकरोड ते द्वारका ईलिव्हेटेड कॉरिडॉर करणार असल्याची घोषणाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारामुळे आज आदिवासी दुर्गम भागातील वाहतूक अत्यंत सुलभ झाली असून त्यामुळे वाडे-पाडे शहराशी जोडले गेले असून कोरोनाकाळात केवळ वेळच नाहीतर कितीतरी जीव या राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीमुळे वाचले असल्याची भवना यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली.

नाशिकरोड ते द्वारका चौक ईलिव्हेटेड कॉरिडोर होणार

नाशिकरोड ते द्वारका चौक हा नाशिक- पुण्याचा भाग असुन नुकताच भारतमाला परियोजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे द्वारका चौकातील वाहतुक कोंडी नामशेष होणार असून नाशिक रोड ते द्वारका प्रवास फक्त अर्ध्या वेळेत होणार आहे. चौका चौकातल्या वाहतुक कोंडीचे निराकरणासोबत अपघातांची मालिका खंडीत होऊन प्रवास सुखद, सुरक्षित आणि सहज होईल.

आपली प्रतिक्रिया द्या