‘जेजे’मधील 202 डॉक्टरांना निवडणूक ड्युटीतून वगळले, शिव आरोग्य सेनेचाही पाठपुरावा

जेजेमधील 202 डॉक्टर, अधिकारी आणि वैद्यकीय स्टाफला अखेर निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे. पालिकेच्या निर्देशानुसार तब्बल 378 डॉक्टर, अधिकाऱयांना इलेक्शन डय़ुटी लावण्यात आली होती. यामुळे जेजेची आरोग्य सेवा कोलमडणार होती. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये बातमीही प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेत शिवसेनाप्रणीत शिव आरोग्य सेनेनेदेखील पालिका प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले.

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सक्तीच्या आदेशानुसार जे.जे. रुग्णालयातील आरोग्याशी निगडित डॉक्टर, नर्सेस, विविध तंत्रज्ञ अशा शेकडो कर्मचाऱयांना निवडणूक कामात सक्तीने जुंपण्यात येणार होते. यामुळे दररोज येणारे हजारो रुग्ण आणि गंभीर आजाराने दाखल असलेल्या रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर व राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार शिष्टमंडळाने उपायुक्त विश्वास शंकरवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. महत्त्वाच्या जबाबदारी असणाऱया कर्मचाऱयांना निवडणूक कामातून वगळा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आरोग्य सेनेचे मलबार हिल समन्वयक सचिव मिलिंद वेदपाठक, डॉक्टर सेल मुंबई सचिव डॉ.अलिफिया रिझवी, भायखळा विधानसभा समन्वयक रवींद्र बाचनकर, राजाराम झगडे, अक्षया चव्हाण, संजय घोडके, नेहा कदम, गुलाब ठाकूर व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

निवडणूक आयुक्त उपचार करणार का?

  • जेजेमध्ये 1700 रुग्ण दाखल असून यातील 300 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या रुग्णांची शस्त्रक्रिया, एक्सरे, सिटी
  • स्कॅन आदी उपचार निवडणूक आयुक्त करणार आहेत का, असा संतप्त सवाल यावेळी शिव आरोग्य सेनेने उपस्थित केला. त्यामुळे 202
  • डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱयांना निवडणूक कामातून वगळण्यात आले.