
मुंबईत गेल्या तीन दिवसांत आगीच्या तब्बल 25 घटना घडल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी कफ परेड येथील आजच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कफ परेडच्या मच्छीमार नगर येथील चाळीत पहिल्या मजल्यावर पहाटे 4 वाजता भीषण आग लागली. इलेक्ट्रिक वाहनांच्या
बॅटरी, वायरिंग आणि घरातील वस्तूंनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेत यश विठ्ठल खोत (15) याचा मृत्यू झाला. तर विराज खोत (13) आणि संग्राम कुर्णे (25), देवेंद्र चौधरी (30) हे जखमी झाले. देवेंद्र चौधरी याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. ही आग नक्की कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.