राज्यातील 388 खासगी शाळा अनधिकृत, तब्बल 39 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात; ठाण्यात 88 शाळा अनधिकृत

राज्यामध्ये खासगी व्यवस्थापनाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळांपैकी 388 शाळा अनधिकृतपणे चालवण्यात येत आहेत. या अनधिकृत शाळांमुळे तब्बल 39 हजार 819 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून पुढे आले आहे. ठाणे जिह्यात सध्या 88 अनधिकृत असल्याचेही पुढे आले आहे.

राज्यातील अनधिकृत शाळांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील अनधिकृत शाळांची आकडेवारी दिली.

ठाणे महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असतानाही अनधिकृत शाळांची संख्या वाढत असून लातूर महानगरपालिका क्षेत्रात 20 विनाअनुदानित तर शहरात 30 अनधिकृत शाळा तसेच पिंपरी-चिंचवड ग्रामीण भागातही 49 अनधिकृत शाळा असल्याचे निदर्शनास आले आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर हे अंशतः खरे असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहे.

ठाणे जिह्यात सद्यस्थितीत 88 अनधिकृत शाळा आहेत, त्यात 24 माध्यमिक आणि 64 प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी 41 शाळांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून अनधिकृत शाळा बंद करण्याबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 22 अनधिकृत शाळा सुरू असून त्यापैकी 11 शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित शाळांपैकी सहा शाळांना मान्यता मिळाली असून पाच शाळांना इरादापत्र प्राप्त झाले आहे.

राज्यात अनधिकृत शाळांना रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून केलेल्या तपासणीमध्ये 661 शाळा अनधिकृत सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यातील केवळ 78 शाळाच बंद करण्यात आल्याचे हे खरे आहे का, या प्रश्नावर हे अंशतः खरे असल्याचे शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे.

शासन स्तरावर झालेल्या बैठकानंतर 661 शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते, पण राज्य सरकारने मागील दोन वर्षांत घेतलेल्या विशेष मोहिमेद्वारे 117 शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचेही उत्तरात नमूद केले आहे. अनधिकृत शाळा बंद केल्यानंतर त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उत्तरात नमूद केले आहे.