
गिरणी कामगारांच्या घरांसाठी सीमांकन करूनसुद्धा वरळीच्या सेंच्युरी मिलमधील सवा एकर जागा मिल व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे मिळत नव्हती. अखेर हा वाद मिटला असून ही जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी देण्याची तयारी सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने दर्शविली आहे. त्यामुळे वरळीतील या जागेवर सेंच्युरी मिल गिरणी कामगारांना आणखी 588 घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
सेंच्युरी मिलमधील हा भूखंड गिरणी कामगारांच्या घरासाठी मिळावा यासाठी गिरणी कामगार संघर्ष समिती गेली 12 वर्षे प्रयत्नशील होती. सेंच्युरी मिल व्यवस्थापनाचा या जागेसंबंधी असलेला वाद मिटला आहे. हे समजताच गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग आणि सेंच्युरी एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, जितेंद्र राणे यांनी शुक्रवारी मॉनेटरी कमिटीत झालेल्या सुनावणीवेळी ही जागा मिळावी म्हणून जोरदार मागणी केली. म्हाडाचे कार्यकारी अभियंता गावित यांनीसुध्दा ही जागा गिरणी कामगारांसाठी आहे, असे लेखी कळविले. तेव्हा सेंच्युरी मिल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी सुनीता थापलियाल यांनी सांगितले, या जागेच्या विकासाची प्रक्रिया चालू करून गिरणी कामगारांना त्यांची घरे दिली जातील. सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे गिरणी कामगार संघर्ष समिती व सेंच्युरी मिल एकता मंच या संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.