अमेरिकेची रोबोटिक हत्तीण धारावीच्या शाळेत; सोंड हलवते…कान हलवते…बोलतेसुद्धा, विद्यार्थ्यांशी साधणार हिंदी-इंग्रजीत संवाद

अमेरिकेची ‘एली’ हत्तीण धारावीच्या शाळेत येतेय. पण ही हत्तीण खरीखुरी नाही तर एक रोबो आहे. तिला भेटणाऱ्याला मात्र ती खरीच असल्यासारखे जाणवेल. कारण ती सोंड हलवते, कान हलवते आणि चक्क हिंदी आणि इंग्रजीत बोलतेसुद्धा.

महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या छत्रपती शिवाजी राजे विद्यालय व मनोहर जोशी कॉलेजमध्ये मॅटरली फाऊंडेशन आणि पेटा इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार बाबुराव माने, सचिव दिलीप शिंदे, खजिनदार प्रमोद माने, मुख्याध्यापिका श्रद्धा माने, विना दोनवलकर तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

‘‘हत्तीण आपले दुःख विद्यार्थ्यांना सांगणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम आणि जाणीव दृढ होईल,’’ असे प्राचार्या व संस्थेच्या विश्वस्त स्वाती होलमुखे यांनी सांगितले.