
ऑनलाइन टास्कमध्ये फसवणूक झाल्याने अल्पवयीन मुलाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येप्रकरणी एकाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. बिनोद राजवंशी असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत मुलगा अंधेरी जोगेश्वरी येथे राहत होता. तो एका नामांकित महाविद्यालयात शिकत होता. गेल्या जानेवारी महिन्यात तो शिकवणीसाठी घरातून निघाला. रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. याचदरम्यान त्यांना जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एका मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या पालकांना मिळाली. त्यानंतर पालक कूपर रुग्णालयात गेले. त्यानंतर मुलाची ओळख पटली. घडल्या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.





























































