शिंदे दऱ्यात, गट तळ्यात मळ्यात; भाजप वाटाघाटीस तयार नसल्याने कोंडी आणि अस्वस्थता

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असले तरी सत्तेच्या वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महापौर पद आणि स्थायी समितीचे अध्यक्ष पद याबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. भाजपसोबत एकत्र गट स्थापन करायचा की वेगळी नोंदणी करायची यावरून त्यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. उपमुख्यमंत्री शिंदे अचानक साताऱयात दरेगावी निघून गेले. यामुळे शिंदे गटात चलबिचल सुरू असल्याने गटनोंदणीसाठी नगरसेवकांना कोकण भवन येथे घेऊन जाण्यासाठी आलेल्या बसला रिकामीच माघारी परतावे लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यावर शिंदे गट आणि भाजप यांच्यात मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपासंदर्भात चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण फडणवीस मायदेशी परतल्यावरही बैठक झालेली नाही. त्यातच दोन्ही पक्षांनी संयुक्त गट नोंदणी करावी यासाठी भाजपचा आग्रह आहे. पण शिंद गटाने स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिंदे गटाचे 29 नगरसेवक आज नवी मुंबईतील कोकण भवनात गट नोंदणीसाठी जाणार होते. पण गट नोंदणीचा आजचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. या नगरसेवकांना नवी मुंबईला नेण्यासाठी लक्झरी बसदेखील सज्ज होती, पण ती परत पाठवण्यात आल्याने मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेवरून महायुतीत धुसफुस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गटनेतेपद भाजपकडे, तर शिंदे गटाला प्रतोदपद

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांची एकच गट म्हणून नोंदणी केल्यास स्थायी समितीसह अन्य समित्यांमध्ये एक-दोन सदस्य वाढण्याची शक्यता आहे. गटनेतेपद भाजपकडे आणि शिंदे गटाला प्रतोदपद देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेतील फायद्याचा विचार करून गटनोंदणी – फडणवीस

महापालिकेत गट स्थापन करताना पर्सेंटेज पॉइंटचा विचार करावा लागतो. कधी एकत्र तर कधी वेगळय़ा गटनोंदणीचा फायदा होत असतो. महापौर आणि उपमहापौरपद सोडले तर बाकी सर्व पदं ही सदस्य संख्येच्या गुणोत्तरावर ठरतात. त्यानुसार आमचं अंदाज घेणं चालू आहे. त्या आधारावर दोन्ही गट एकत्र नोंदणी करून फायदा आहे की वेगळी नोंदणी करून फायदा आहे किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे याबाबतचा निर्णय करूनच गटनोंदणीचा निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गटनोंदणी कार्यक्रम दोनदा रद्द

शिंदे गटाच्या नोंदणीचा कार्यक्रम दोनदा रद्द झाला आहे. याआधी 20 जानेवारीला नोंदणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्या वेळीही हा कार्यक्रम रद्द झाला. सत्ता पदांच्या वाटपांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच चर्चा होणार आहे.

  • महायुतीमधील दोन्ही पक्षांनी मिळून एकच गट तयार करावा, असा भाजपचा आग्रह होता. त्यामुळे स्थायी समितीत भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल.
  • स्वतंत्र गट तयार करून आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. एकच गट म्हणून दोन्ही पक्षांची नोंद झाल्यास भाजपच्या मागे फरफट होण्याची भीती आहे.

एकनाथ शिंदेंची पुन्हा कॅबिनेटला दांडी

मुंबई महापालिकेत भाजपसोबत राहूनदेखील काहीच फायदा न झाल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत. निवडणूक निकालानंतरच्या दुसऱया दिवशीच्या मंत्रिमंडळ बैठकीला मुंबईत असतानादेखील दांडी मारत त्यांनी आपली नाराजी अधोरेखीत केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिंदे यांनी बैठकीला दांडी मारली. शिंदे दोन दिवस सातारा मुक्कामी आहेत.