
मुंबईची वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी पालिका नवे गारगाई धरण बांधणार असले तरी हे धरण तीन लाखांवर झाडांच्या मुळावर येणार आहे. प्रकल्पात कोणतेही झाड तोडले जाणार नसून धरण परिसरात ही सर्व झाडे त्याच परिसरात पुनर्रोपित करणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र पुनर्रोपित झाडांपैकी किती झाडे जगतील याची खात्री नसल्याने ही झाडे वाचणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुंबईचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.
प्रकल्पात वीजनिर्मिती
- या प्रकल्पासाठी पालिका तीन हजार कोटींवर रुपये खर्च करणार आहे. गारगाईमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पातून दररोज निर्माण होणारी 1.2 मेगावॅट वीज प्रकल्पस्थळाची विजेची गरज भागवणार असून जादाची वीज पालिकेला उत्पन्नही मिळवून देणार आहे.
- या प्रकल्पात बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात पाचपट झाडे राज्यातील इतर चार जिह्यांमध्ये लावण्यात येणार आहेत. यामध्ये चंद्रपूर, वाशीम आणि हिंगोली यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित जिह्यांतील जमीन वनीकरणासाठी घेण्यात येईल.



























































