बाप्पा पावला! खड्ड्यांसाठीचा अवाच्या सवा दंड रद्द! पालिकेकडून गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा

गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱया मंडपामुळे पडणाऱ्या खड्डय़ांसाठी निश्चित करण्यात आलेला 15 हजारांचा दंड पालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील हजारो मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे आता खड्डा बुजवला नाहीतर फक्त दोन हजारांचाच दंड आकारण्यात येईल.

मुंबईतील सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळय़ा जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. यासाठी पालिकेकडून मंडळांना परवानगी मिळाली तरी रस्त्यांवर खड्डे पाडल्यास पालिकेकडून याआधी दोन हजारांचा दंड घेतला जायचा. मात्र या वर्षी पालिकेने अचानक प्रतिखड्डा 15 हजार रुपये वसूल करण्याचे फर्मान काढले होते. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा अवास्तव दंड कमी करावा अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीकडून पालिका आणि राज्य सरकारकडे करण्यात आली होती.

…तर दोन हजार भरावे लागणार

गेल्या आठ वर्षांपासून मंडपाच्या प्रत्येक खड्डय़ासाठी दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत होता. बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर दोन दिवस पालिकेच्या रस्ते विभागाकडून मंडपांच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात येते. यामध्ये मंडपामुळे पडलेले खड्डे बुजवलेले नसल्यास दोन हजारांचा दंड आकरण्यात येत होता. त्यामुळे मंडळांकडून विसर्जनानंतर पडलेले खड्डे बुजवण्यात येतात, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली.