
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक वातानुपूलित बसेसचा समावेश केल्यानंतर अनेक बससेवांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. शहर परिसरासह पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील 23 बसगाड्यांच्या मार्गांमध्ये शनिवारपासून बदल केला जाणार आहे. तसेच आठ बसमार्गांवरील साध्या बसेसचे आता एसी बसेसमध्ये रूपांतर केले जाणार आहे.
मुंबईकरांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी 157 एसी बसेसचे लोकार्पण केले. त्या बसेसचे बेस्टच्या सध्याच्या वेळापत्रकात नियोजन करण्यात आले असून त्यानुसार शहर आणि उपनगरांतील 23 बसगाड्यांच्या मार्गांमध्ये बदल केला आहे. यामध्ये ए-1, ए-6, ए-30, सी-40, ए-45, ए-49, ए -458, ए-69, ए-77, ए-78, ए-171, 235, 307 अशा विविध बससेवांचा समावेश आहे. तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (भाटिया बाग) यादरम्यान ए-101 ही नवीन बससेवा चालवण्यात येणार आहे. शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी रस्त्यांवर कामे सुरू होती. त्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर बससेवांच्या मार्गांमध्ये बदल केला होता. त्या गाड्या पर्यायी मार्गावरून वळवल्या. त्यांची सेवा पूर्वीच्या मार्गावरून पूर्ववत केली आहे. त्यामुळे प्रवाशांची झालेली गैरसोय दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान एसी बसगाड्यांचे पहिल्या टप्प्यातील तिकीट 12 रुपयांऐवजी 10 रुपये करण्याची मागणीही मुंबईकरांकडून केली जात आहे.
‘या’ बसगाड्यांचे एसीत रूपांतर
ए-207 – मालवणी आगार ते दहिसर बसस्थानक
ए-211 – वांद्रे बसस्थानक (प.) ते फादर अॅग्नल आश्रम
ए-215 – वांद्रे रेक्लेमेशन बसस्थानक ते टाटा वसाहत
ए-399 – ट्रॉम्बे ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
ए -410 – विक्रोळी आगार ते कोंडिवटे गुंफा/महाकाली गुंफा
ए-604 – कांजूरमार्ग स्थानक (प.) ते भांडुप स्थानक (प.)
ए- 605 – भांडुप स्थानक (प.) ते टेंभीपाडा नाका
ए – 606 – भांडुप स्थानक (प.) ते अशोक केदारे चौक

























































