Mumbai News – दादर स्थानकात मोठी दुर्घटना टळली, बोरीवली-चर्चगेट लोकलला हादरा; प्रवाशांमध्ये गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दादर स्थानकात मोठी दुर्घटना टळली आहे. बोरीवली लोकलला स्थानकात येताच अचानक मोठा हादरा बसला आणि लोकल जागेवरच थांबली. यानंतर लोकलमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी लोकलमधून उड्या घेतल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

बोरीवलीहून सोमवारी सायंकाळी 4.50 ला सुटलेली चर्चगेट जलद लोकल सायंकाळी 5.33 वाजता दादर स्थानकात आली. दादर स्थानकात येताच लोकलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि ट्रेनला जोरात हादरा बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. हादरा बसून ट्रेन थांबली, मग झटके देत पुढे सरकू लागली.

या घटनेमुळे जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एकच पळापळ झाली. प्रवाशांनी चालू ट्रेनमधून उड्या घेतल्या. यात काही प्रवासी डब्यातच पडल्याचे कळते. यानंतर ट्रेन प्रभादेवीला स्थानकावर पोहचताच जीआरपीचे पथक तात्काळ दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रेल्वे प्रशासन सखोल चौकशी करत आहे.