
भायखळा येथील ब्रिटिशकालीन ‘वाय ब्रिज’ची जागा घेण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे. मध्यवर्ती खांबापासून पुलाच्या डेकपर्यंत केबल जोडण्याच्या महत्त्वाच्या कामाला सध्या गती देण्यात आली आहे. मार्च 2026पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून युद्धपातळीवर काम केले जात आहे.
भायखळा केबल-स्टेड पुलाचे काम महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. हा पूल 916 मीटर लांब आणि चार मार्गिकांचा असणार आहे. सध्याच्या पुलाच्या तुलनेत दुप्पट रुंदी असल्याने नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या दक्षिण मुंबईतील रस्ते प्रवासाला गती मिळणार आहे.
























































