
करणी करते आणि मुलांचे ऐकते यावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना धारावी येथे घडली. सूरजबेन अमृत सोलंकी असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी अमृत सोलंकीला धारावी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सूरजबेन आणि अमृत यांच्यात किरकोळ वाद होत होते. तेव्हा अमृतला नातेवाईकांनी समजदेखील दिली होती. तरीदेखील तो वारंवार सूरजबेनशी भांडण करायचा. आपल्या भांडणात कोणी येऊ नये अशी तंबीदेखील अमृतने मुलांना दिली होती. गेल्या बुधवारी काही नातेवाईक अमृतच्या घरी आले होते. तेव्हा अमृत आणि सूरजबेनमध्ये भांडण झाले. तेव्हादेखील त्या नातेवाईकाने अमृतला भांडण करू नको असे सांगितले होते. तेव्हा अमृतने सूरजबेनला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
शुक्रवारी अमृतच्या नात्यामधील एका महिलेचे निधन झाले होते. तिच्या अंत्यविधीला त्याचा मुलगा घरी आला. तेव्हा त्याने दरवाजा ठोकला. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्याने अमृतला व्हिडीओ कॉल केला. तेव्हा अमृतच्या डोक्याला आणि कपड्यावर रक्त होते. अमृतने पत्नीची हत्या केल्याचे मुलाला सांगितले. स्थानिक रहिवासी तेथे आले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा सूरजबेन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.





























































