महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबरला, राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील 29 महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

महानगर पालिका निवडणुकीत वापरण्यात येणारी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आज जाहीर केला. महापालिकांना देण्यात आलेल्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करून 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून 6 नोव्हेंबरला पालिका निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

10 डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय यादी

महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर 14 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर 28 नोव्हेंबरपर्यंत प्रभागनिहाय अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 10 डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.