दारु पित असताना काही कारणातून बापलेकात वाद झाला. वादातून बापाने चाकूने भोसकून मुलाची हत्या केल्याची घटना दादरमध्ये घडली. मुलाची हत्या केल्यानंतर बापाने पोलिसात धाव घेत अज्ञात व्यक्तीकडून मुलाची हत्या झाल्याचा दावा केला. मात्र पोलीस तपासात सत्य समोर आले. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
दोघे पित-पुत्र मूळचे औरंगाबादचे आहेत. मुलगा वारंवार घरच्यांना न सांगता मुंबईत येत असे. त्याला शोधायला वडील मुंबईत आले होते. पिता-पुत्र दोघांनाही दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी दोघे एकत्र मद्यपान करत असताना वाद झाल्याने वडिलांनी आपल्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.
हत्या केल्यानंतर अज्ञाताने मुलाची हत्या केल्याचा दावा आरोपी बापाने केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये हत्येपूर्वी आणि नंतर वडील मुलासोबत असल्याचे स्पष्टपणे दिसले. याशिवाय, प्रत्यक्षदर्शीनी वडिलांना गुन्हा करताना पाहिल्याची पुष्टी केली. पुराव्यांवरून दादर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून वृद्धाला अटक केली.