
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, लेझिमच्या तालावर थिरकणारी तरुणाई अशा मोठ्या जल्लोषात रविवारी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शहर आणि उपनगरात रात्री ९ वाजेपर्यंत २७५ सार्वजनिक तर १६८१६ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर रविवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पाच दिवसांच्या बाप्पाचे समुद्र, कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले. विसर्जनसाठी पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारनंतर चौपाट्या, कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनसाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूका सुरू होत्या. गर्दी टाळण्यासाठी काही सोसायट्यांनी सोसायटीच्या आवारातच बाप्पाचे विसर्जन केले. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बच्चेकंपनी भावूक झाली होती.