
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या असून येत्या 8 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
फेरीवाल्यांसाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी न करता पालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते आहे. रोज फेरीवाल्यांचा माल जप्त केला जात असून त्याचा पंचनामा केला जात नाही, दंड भरून घेतलेला माल अर्ध्याहून अधिक गायब केला जातो, फेरीवाल्यांना धमकावून हप्ता जमा केला जातो, असा आरोप फेरीवाल्यांच्या संघटनांनी केला आहे. रोजच्या कारवाईमुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे पालिकेने कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र हॉकर फेडरेशनने केली आहे.
अशा आहेत मागण्या
- पथविव्रेता उपजीविका कायदा कलम 38 अंतर्गत अंतिम योजना शहर विव्रेता समितीसोबत विचारविनिमय करून योजना घोषित करावी.
- पथविव्रेता अधिनियम 2014 कायद्याची अंमलबजावणी करावी. तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये.
- पाच वर्षांतून एकदा रीतसर पथविव्रेत्यांचे सर्वेक्षण करून फेरीवाल्यांना प्रमाणपत्र द्यावे.
- सविस्तर चर्चेसाठी राज्य सरकारने फेरीवाला संघटनांची एकत्रित बैठक आयोजित करावी.




























































