
महायुती सरकारने लागू केलेले मराठा आरक्षण टिकणार की नाही यावरील पुढील सुनावणी 27 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात होणार आहे. या आरक्षणाविरोधात व समर्थनार्थ डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मारणे व न्या. एन.जे. जमादार यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. केंद्रीय व राज्य मागासवर्गीय आयोगाशी सल्लामसलत न करता राज्य शासनाने हे आरक्षण लागू केले आहे, असा आरोप ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी केला. पुढील सुनावणी 27 फेब्रुवारीला होईल व त्यानंतर 7 मार्चला होईल. या दिवसांत तुम्ही तुमचा युक्तिवाद पूर्ण करा, असे न्यायालयाने अंतुरकर यांना सांगितले. त्यानंतर अॅड. सुभाष झा युक्तिवाद करतील. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर राज्य शासन आपली भूमिका मांडेल, असे पूर्णपीठाने स्पष्ट केले.






























































