Mumbai News – घरगुती वाद टोकाला गेला, पत्नीला संपवत पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दहिसरमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दहिसरमधील गणपत पाटील नगर येथे ही घटना घडली. पप्पू मनु राठोड असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.

पप्पू हा रोजंदारीवर काम करतो. पप्पूचा पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर शनिवारी हा वाद विकोपाला गेला आणि पप्पूने आधी ग्राइंडिंग मशिनने पत्नीच्या डोक्यात वार केले. मग गळा दाबून पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पप्पूने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा कबुल केला. यानंतर पोलिसांनी पप्पूच्या घरी धाव घेतली.

पोलिसांनी घरी दाखल होत बेशुद्धावस्थेतील पीडितेला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नातेवाईक आणि शेजाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.