Mumbai News – शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर महिला पोलिसाचा मृत्यू, अंधेरीतील घटना

शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर प्रकृती खालावल्याने महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. गौरी सुभाष पाटील असे मयत महिला पोलिसाचे नाव आहे. पाटील या अंधेरीतील मरोळ येथे मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागात तैनात होत्या.

पाटील यांना कानाच्या शस्त्रक्रियेसाठी अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी शस्त्रक्रियेपूर्वी पाटील यांना भूल देण्यात आली. भूल दिल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण उघड होईल. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.