मुसळधार पावसामुळे लोकलसेवा रखडली, पश्चिम रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द; ‘मरे’वर एक्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई शहर व उपनगरांसह पालघर जिह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवेची रखडपट्टी झाली. सकाळी पावसाचा जोर वाढल्याने दृश्यमानता कमी झाली. त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला. सायंकाळपर्यंत लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेवर एक्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे दोन्ही मार्गांवर प्रवाशांची तारांबळ उडाली.

गेल्या आठवडाभरापासून पश्चिम रेल्वे वारंवार विस्कळीत होत आहे. विविध कारणांमुळे लोकल सेवा उशिराने धावत आहे. अनेक फेऱ्या 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत असल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. रविवारी मुसळधार पावसाचा लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला. याचदरम्यान वाणगाव ते डहाणू स्थानकांदरम्यान अमृतसर एक्प्रेसच्या दोन डब्यांतील कपलिंग तुटले.

परिणामी, चर्चगेट ते विरार-डहाणूपर्यंतच्या लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. गेल्या काही दिवसांत पश्चिम रेल्वे प्रशासन लोकल सेवेचे योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरले आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली.

मध्य रेल्वेवर ‘ब्लॉक’ गोंधळ

मध्य रेल्वेने रविवारी विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या व सहाव्या मार्गिकांवर तसेच ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉक काळात मेन लाईनवर एक्स्प्रेस गाड्या लोकलच्या मार्गिकांवरून वळवण्यात आल्या. त्याचा लोकल सेवेवर परिणाम झाला आणि बहुतांश रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही ‘ब्लॉक’चा मनस्ताप सहन करावा लागला.