अबब! म्हाडाच्या पवईतील दुकानासाठी लागली 22 कोटींची बोली

म्हाडाच्या मुंबईतील दुकानांचा नुकताच ई-लिलाव करण्यात आला. यात कोपरी पवई येथील एका दुकानासाठी तब्बल 22 कोटी रुपयांची बोली लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे म्हाडाने या दुकानाची बेस प्राईज अडीच कोटींच्या आसपास ठेवली होती.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव, मालवणी, कांदिवली, मागाठाणे, कुर्ला, मुलुंड, शीव आणि पवई येथील 149 दुकानांच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या दुकानांसाठी तब्बल 454 जणांनी अनामत रकमेसह अर्ज केले होते. गुरुवारी या दुकानांचा ऑनलाईन लिलाव करण्यात आला. या लिलावात प्रतीक्षा नगरमधील एका दुकानासाठी सर्वात कमी म्हणजे 35 लाख रुपयांची तर कोपरी पवईतील एका दुकानासाठी सर्वाधिक म्हणजे 22 कोटी रुपयांची बोली लागली. विजेत्या अर्जदारांना म्हाडाकडून स्वीकृती पत्र पाठवण्यात आले असून अॅप किंवा वेबसाईटवरून दहा दिवसांत त्यांना दुकान स्वीकारायचे किंवा नाकारायचे आहे.

शंभर कोटींचा महसूल मिळणार

दुकानांच्या या लिलावात साधारण 60 ते 70 दुकानांना अर्जदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. यात मालवणी आणि बिबिंसार नगर येथील काही दुकानांचा समावेश आहे. मात्र उर्वरित दुकानांच्या विक्रीतून म्हाडाला सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.