नोव्हेंबरपासून पगार नाही; डोंगरी, मानखुर्द बालगृहातील सुरक्षा रक्षकांची आर्थिक कोंडी

डोंगरी आणि मानखुर्द येथील बालगृहात कार्यरत असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून वेतनच न मिळाल्याने ते सुरक्षा रक्षक हैराण झाले आहेत. परिणामी त्यांनी कामावरच न जाण्याचा पवित्रा घेतल्याने या दोन्ही बालगृहांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्मार्ट सर्व्हिस या सुरक्षा रक्षक कंपनीचे सुरक्षा रक्षक डोंगरी, डेव्हिड ससून आणि मानखुर्द येथील बालगृहात सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आले होते; पण नोव्हेंबरपासून वेतनच दिले जात नसल्याने या सुरक्षा रक्षकांची गोची झाली आहे. बालगृहाचे अधीक्षक तसेच वरिष्ठांकडे याकडे लक्ष वेधूनदेखील वेतन दिले जात नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. महिन्याला साडेतेरा हजार पगार मिळतो; पण आता तोही मिळत नसल्याने आमची पंचाईत झाली आहे. आमच्याकडे कोणी लक्षच द्यायला तयार नसल्याने करायचे तरी काय अशा संकटात आम्ही सापडलो आहोत. त्यामुळे आम्ही ‘काम बंद’ आंदोलन पुकारले असल्याचे सुरक्षा रक्षकांनी दै. सामनाशी बोलताना सांगितले.

सुरक्षा व्यवस्था डगमगली

डोंगरी बालगृहात 12, डेव्हिड ससून आणि मानखुर्दमध्येदेखील तितकेच खासगी सुरक्षा रक्षक तैनात आहेत; पण त्यांनी अचानक कामावर जाणे बंद केल्याने डोंगरी व मानखुर्द येथील बालगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.