
मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन रोज अर्धा तास विलंबाने धावत आहेत. परिणामी, प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. लोकल ट्रेन वेळेवर चालवा, 15 डबा लोकलसाठी अनेक स्थानकांतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवा आदी प्रमुख मागण्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले.
मध्य रेल्वे मार्गावर मेल-एक्सप्रेस गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने लोकल ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. ऐन ‘पीक अवर्स’ला लोकल ट्रेन अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्याचा परिणाम प्रवाशांच्या नोकरी-व्यवसायावर होत आहे. या अनुषंगाने रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सीपीटीएम (मुख्य परिचालन प्रबंधक) मिलिंद हिरवे आणि एसडीओएम अनंत शर्मा यांची भेट घेतली. लोकल प्रवाशांना दैनंदिन प्रवासात होणारा त्रास, लोकल फेऱ्यांचा विलंब, रखडलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य न देता लोकल ट्रेन वेळेवर चालवणे आदी प्रमुख विषयांवर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
बैठकीला महासंघाच्या अध्यक्षा लता आरगडे, सरचिटणीस जितेंद्र विशे, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव, ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख, कल्याण कसारा पॅसेंजर अससोसिएशनचे जगदीश धनगर, शैलेश राऊत, महेश तारमळे उपस्थित होते. प्रवाशांच्या प्रश्नांसंदर्भात शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका मांडल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला.



























































