
मत्स्यविकास महामंडळाने ससून डॉकमधील गोदामांची वीज आज अचानक कापली. याच्या निषेधार्थ कोळी बांधवांनी आज जोरदार आंदोलन केले. आम्ही मुंबईमधील भूमिपुत्र आहोत. त्यामुळे आम्हाला ससून डॉक परिसरातून हुसकावण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा. भूमिपुत्र कोळी बांधवांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.
ससून डॉकमधील कोळी बांधव राज्य सरकारच्या एमएफडीसीला नियमितपणे भाडे भरत आहेत. असे असताना भाडे आपल्याला मिळालेच नाही असा दावा करीत मुंबई पोर्ट प्राधिकरणाने मासळी व्यावसायिकांना जागा सोडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. सरकार आता तर वीज कापून त्रास देत आहेत.
दरम्यान, ही जागा बिल्डरला देण्यासाठीच अशा नोटिसा बजावल्या जात असल्याची माहिती ससून डॉक मासेमारी बंदर बचाव कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा पवळे यांनी दिली.
सरकारच्या आश्वासनाचे काय झाले?
या कोळी बांधवांना मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी ठोस आश्वासन देत कोणतीही कारवाई होणार नाही असे सांगितले होते. मात्र आता नोटिसा आल्यामुळे सरकारच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल कोळी बांधवांनी उपस्थित केला आहे. एकीकडे एमबीपीटी पोलीस बंदोबस्तात गोदामे रिकामी करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे एमएफडीसी वीज तोडून त्रास देत असल्याचा आरोपही कोळी बांधवांनी केला.