मासळी बाजाराविरोधात दादरमध्ये आंदोलन; वाहतूककोंडी, दुर्गंधीच्या प्रश्नाकडे रहिवाशांनी वेधले लक्ष

दादरच्या सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजार तत्काळ स्थलांतरित करा, अशी मागणी करीत स्थानिक रहिवाशांनी रविवारी सकाळी भरपावसात आंदोलन केले. आंदोलनात दादर येथील स्वराज्य सहकारी गृहनिर्माण संस्थेसह परिसरातील 200हून अधिक स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते. रहिवाशांनी वाहतूक कोंडी, पदपथावरील अडथळे, दुर्गंधी आदी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

दादर येथील मासळी बाजार 25 वर्षांपासून रस्त्यावर सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांच्या अनुषंगाने मासळी बाजार दुसरीकडे हलवण्याची मागणी करीत स्थानिक रहिवाशांनी रविवारी आंदोलन केले. येथील मासळी बाजार 2021मध्ये पाडण्यात आला. त्याचे ऑगस्ट 2022पूर्वी स्थलांतर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ते केलेले नाही. काही दिवसांपूर्वी एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्यात आला. त्यानंतर दादरमधील वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे.

आरोग्य, स्वच्छता, पादचारी मार्ग बंद होणे, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांमध्ये अडथळा हे गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजार तत्काळ अन्यत्र हलवण्याची मागणी रहिवाशांनी केली. दादर पोलिसांनी रहिवाशांना मासळी बाजारासमोर आंदोलन करण्यास मनाई केली. सोसायटीच्या गेटवर लावलेले आंदोलनाचे बॅनर पोलिसांनी काढले. त्यानंतर रहिवाशांनी सोसायटी परिसरात शांततापूर्ण आंदोलन केले. पादचारी मार्ग आमचा हक्क आहे. आम्हाला स्वच्छता हवीय, गोंधळ नको, अशी भूमिका रहिवाशांनी आंदोलनादरम्यान मांडली.

पुढील महिनाभरात वडाळ्यात स्थलांतर

रहिवाशांनी प्रशासनाच्या निक्रियतेचा निषेध केला. या वेळी स्थानिक शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आंदोलनकर्त्या रहिवाशांची भेट घेतली. दादरच्या रहिवाशांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेतली आहे. मासळी बाजाराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाशी बोलणी केली असून पुढील महिनाभरात (दिवाळीनंतर) सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजार वडाळ्यातील जागेवर स्थलांतरित केला जाईल, असे आश्वासन आमदार महेश सावंत यांनी रहिवाशांना दिले.