
विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांना घडवणारे व हिंदुस्थानचा गौरव वाढवणारे ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या जयंती निमित्त 3 डिसेंबर रोजी विशेष सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या गेट क्र. 5 येथील आचरेकर स्मारकाजवळ सायंकाळी 5 वाजता हा सोहळा होईल. क्रिकेट जगतातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहून सरांना आदरांजली वाहणार आहेत. क्रिकेटप्रेमी व खेळाडूंनी मोठय़ा संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दालमिया लायन्स खेल महोत्सवाचे आयोजन
‘प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स’तर्फे मालाड येथे महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवसीय दालमिया लायन्स खेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी 3 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल.
महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर या प्रमुख अतिथी असतील. तर, राष्ट्रीय वुशू आणि पुंग-फू चॅम्पियन विधी अग्रवाल-कोटप आणि प्रसिद्ध आत्मरक्षण तज्ञ कार्तिकी दळवी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे विश्वस्त व सरचिटणीस कन्हैयालाल जी. सराफ, प्राचार्य डॉ. डी. एन. गंजेवार, क्रीडा विभागप्रमख राजेश मौर्य आणि प्रसिद्धी विभागप्रमुख पूनम पटवर्धन हे प्रयत्नशील आहेत.
सातघरे संघाचा निर्णायक विजय
सदाशिव सातघरे संघाने अनंत धामणे संघाचा 8 फलंदाज राखून दणदणीत पराभव करत 16 वर्षे वयोगटाच्या दुसऱया तुकाराम सुर्वे स्मृती दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यातून विजयाचे 5 गुण आपल्या खात्यात जमा केले. रुद्र गिरीचे सामन्यातील आठ विकेट, तन्मय मालुसरे आणि निरव बोरकरची अर्धशतके सदाशिव सातघरे संघाच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. दादोजी काsंडदेव स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सदाशिव सातघरे संघाला खूपच फायदेशीर ठरला. रुद्रने 24 धावांत 5 आणि अवनीश नाखवाने 28 धावांत 3 बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांना रोखले. सार्थ पटेलच्या नाबाद 90 धावांमुळे अनंत धामणे संघाला 139 धावा बनवता आल्या. त्याला उत्तर देताना पहिल्या डावात तन्मयच्या 52 धावांच्या जोरावर 157 धावा करत सदाशिव सातघरे संघाने 18 धावांची आघाडी मिळवत सामन्यात पकड मिळवली. दुसऱया डावात सोहम लाडच्या 56 धावांमुळे अनंत धामणे संघाने 9 बाद 162 धावसंख्येवर डाव घोषित केला. या डावात रुद्रने 3 आणि आयुष सर्वेने 43 धावांत 4 बळी मिळवले. निरव बोरकर 71 आणि शायन शेखने 30 धावा करत संघाला विजयासाठी आवश्यक असणाऱया 141 धावा पार केल्या.



























































