कारवाई नाहीच; फक्त खाते बदलले; ‘रमीपटू’ कोकाटे क्रीडा मंत्री, कृषी खात्याची जबाबदारी भरणेंकडे

विधिमंडळ सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांचे फक्त खाते बदलले. ‘रमीपटू’ कोकाटेंकडे क्रीडा खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

माणिकराव कोकाटे रमीमुळे वादाच्या भोवऱयात अडकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी त्यांना आपल्या भेटीसाठी बोलवून कडक शब्दांत तंबी दिली होती. परंतु सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला नव्हता. मात्र खातेबदलाची शिक्षा त्यांना दिली आहे. सभागृहाच्या कामकाजातही देहभान हरपून रमी खेळणाऱया कोकाटेंकडे रात्री उशिरा क्रीडा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना काढत जाहीर करण्यात आले.

कोकाटे यांच्याकडून काढून घेतलेल्या कृषी खात्याची जबाबदारी अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दत्ता भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

धनंजय मुंडे फडणवीसांना दोनदा भेटले

कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतले जाणार हे निश्चित. त्यातच माजी मंत्री धनजंय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली. बुधवारी रात्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा ते फडणवीस यांना भेटले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित होते.