
वानखेडे स्टेडियमच्या बीसीसीआय ऑफिसमधून आयपीएलच्या 261 जर्सी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्टेडियमच्या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत. ऑडिटदरम्यान ही चोरी उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुखला ऑनलाईन जुगाराचा नाद आहे. जुगार खेळण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी त्याने ही चोरी केली. वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआय कार्यालयातून फारुखने आयपीएल 2025 च्या 261 जर्सी चोरल्या. या चोरी केलेल्या जर्सी त्याने हरियाणातील एका ऑनलाईन जर्सी डिलरला विकल्या.
फारुखने 13 जून रोजी ही चोरी केली. ऑफिसचे नूतनीकरण सुरू असल्याने स्टॉक क्लिअरन्स सेल करत असल्याचे सांगत त्याने हरियाणातील ऑनलाईन डिलरला चोरलेल्या जर्सी विकल्या. ऑडिटदरम्यान जर्सी गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फारुख कार्डबोर्ड बॉक्स घेऊन जाताना दिसला.
पोलिसांनी फारुखला ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. प्रत्येक जर्सीची किंमत 2500 रुपये होती. अशा 6.52 लाख रुपये किंमतीच्या एकूण 261 जर्सी चोरी केल्या. पोलिसांनी आतापर्यंत 50 जर्सी हस्तगत केल्या आहेत. तसेच हरियाणातील त्या डिलरलाही चौकशीसाठी बोलावले आहे.