
अखेर म्हाडाच्या दिंडोशीतील शिवधाम कॉम्प्लेक्स या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून 89 विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यास म्हाडाने सुरुवात केली आहे. लॉटरी लागून वर्ष उलटले तरी घराचा ताबा कधी मिळणार या प्रतीक्षेत विजेते होते. शिवधाम कॉम्प्लेक्सला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले तर दिंडोशीतील शिवनेरी गृहनिर्माण संस्था येथील 133 विजेते अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत.
म्हाडाने गेल्या वर्षी 2030 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात 1327 निर्माणाधीन घरांचादेखील समावेश होता. यामधील शिवधाम आणि शिवनेरी संस्था येथील इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नव्हते. शिवधाम कॉम्प्लेक्सला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने म्हाडाने विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 25 टक्के पैसे भरण्यासाठी 45 दिवसांचा वेळ असणार आहे किंवा 10 टक्के पैसे भरून बँकेकडून कर्ज घेण्यासाठी म्हाडाकडून एनओसी घ्यावी लागणार आहे. उर्वरित 75 टक्के पैसे भरण्यासाठी टप्पा एकच्या मुदतीनंतर 60 दिवसांचा वेळ मिळणार आहे.





























































