
तुमच्या ई-चलान दंडाची रक्कम थकीत आहे. लिंक पाठवलीय त्यावर क्लिक करून पैसे भरा, असा संदेश पाठवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करायची. त्या पैशांतून ऑनलाईन तिकीट खरेदी करायची आणि ते तिकिट ब्लॅकमध्ये विकायचे अशा प्रकारे सायबर गुन्हा करणाऱ्या आरोपींवर एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोघांना ई-चलानचे थकीत दंड भरण्याबाबत संदेश आले होते. तुमचा दंड पटकन भरा, असे म्हणत आरोपीने दोघांनाही एक लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी लिंकवर क्लिक केले असता एपीके फाईल ओपन झाली. त्यामुळे एक सॉफ्टवेअर डाऊनलोड झाले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आरोपींनी दोघांचे मोबाईल हॅक करून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.