
व्हॉट्सअॅपवर स्वस्तात आयफोन खरेदी करण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला 3 लाख रुपयांना गंडा घातला. मुलुंड परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पार्थ पवार असे लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस आता मोहम्मद युसूफ नावाच्या संशयिताचा आणि संबंधित मोबाईल क्रमांकांचा शोध घेत आहेत.
मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, पार्थ पवार याच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर एलिट बेस्ट कंपनी ग्रुपच्या प्रतिनिधीचा मेसेज आला. यात आयफोन 17 प्रो मॅक्स अमेरिकेहून निम्म्या किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. तरुणाचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्याला बनावट ओळखपत्रे, आयफोनचे पॅकिंग आणि फॅक्टरीचे फोटो पाठवले. पार्थने आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवत सुरवातीला 10 हजार रुपये बुकिंग रक्कम पाठवले. यानंतर शिपिंग चार्जेस, कस्टम ड्युटी, टॅक्स आणि क्लिअरन्स फीच्या नावाखाली आरोपींनी वारंवार पैशांची मागणी केली.
ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार्थने एकूण 37 वेळा वेगवेगळ्या यूपीआय आयडीवर तब्बल 2 लाख 99 हजार 500 रुपये ट्रान्सफर केले. मात्र आयफोन आला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पार्थने कुटुंबाला याबाबत माहिती दिली. पार्थने तात्काळ सायबर हेल्पलाइनवर तक्रार केली आणि नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस तपास करत आहेत.


























































