
व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर बोलत भरधाव स्कूटर चालवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. व्हिडिओ कॉलवर बोलताना स्कूटरवरील नियंत्रण सुटले आणि स्पीड ब्रेकरला धडकली. या अपघातात स्कूटरवरील 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात ही घटना घडली. करंतू यादव असे मयत तरुणाचे नाव आहे.
करंतू यादव हा अंधेरी येथील रहिवासी असून कांदिवली पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. तो व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर बोलत स्कूटरने पोईसरहून मालाडकडे जात होता. यादरम्यान शताब्दी रुग्णालयाजवळ त्याचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले. स्कूटर स्पीड ब्रेकरला धडकली आणि तरुण हवेत फेकला जाऊन रस्त्यावर पडला. स्कूटर चालवताना तरुणाने हेल्मेट घातले नव्हते. यामुळे अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



























































